
अमळनेरात घरफोडी; बंद घरातून सव्वा लाखांची रोकड व दागिने लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रस्त्यावरील समर्थ नगरमधील श्रीरंग कॉलनी येथे बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सव्वा लाख रुपयांची रोख रक्कम व किरकोळ दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १२ तारखेला सकाळी समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरंग कॉलनी येथील प्रकाश सुकलाल विसपुते हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत त्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. या घरफोडीत ५ ग्रॅम सोन्याचे कानातले, १०० ग्रॅम चांदीचा गणपती आणि १ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे विसपुते यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने घटनास्थळी पोलीस पथक पाठवले. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज तसेच कर्मचारी मिलिंद सोनार आणि गणेश पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे श्रीरंग कॉलनीसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बंद घरे सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply