
चिमणपुरी-पिंपळे जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे जल्लोषात स्वागत
विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व दप्तरांचे वाटप; नवागत चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिमणपुरी-पिंपळे जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. परिसरात उत्सुकता, चैतन्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
शासनाच्या निर्देशानुसार इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच दप्तरांचे वितरण करण्यात आले. नवीन पुस्तके, दप्तर आणि गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या उपक्रमामुळे शैक्षणिक वर्षाची सुरुवात अधिक प्रेरणादायी ठरली. इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलांचा वर्षाव, टाळ्यांचा कडकडाट, स्वागतगीत आणि शुभेच्छांच्या माध्यमातून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. त्यामुळे नव्या वातावरणाविषयी असलेली भीती दूर होऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. नवीन शैक्षणिक वर्षात मन लावून अभ्यास करून शाळेचे, गावाचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल करण्याचा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक राजेंद्र बागुल, उपशिक्षक सुरेश पाटील, प्रभाकर पाटील, रमेश पाटील, विजया पाटील, श्रद्धा पाटील, रेखा पाटील आणि सीमा पाटील मॅडम उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालकवर्ग, ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, शांताराम पाटील, रामदास भिल आणि भिकन पाटील यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. पालकांनी शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत शैक्षणिक सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवत असून मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि दप्तर वाटप ही त्यातील महत्त्वाची योजना असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनांमुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आनंद लक्षवेधी ठरला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून यंदाचे शैक्षणिक वर्ष गुणवत्तापूर्ण आणि यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply