पोलिसांची धडक कारवाई; चार जणांकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे, तर तरुणाकडून तलवार जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातून गांधली मार्गे अहिल्यानगरकडे गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्या चौघांना अमळनेर पोलिसांनी कारवाई करून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २९ जुलै रोजी सायंकाळी गांधली रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ करण्यात आली. याच दिवशी रात्री भालेराव नगर परिसरात एका तरुणाच्या घरातून तलवार जप्त करून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. एकाच दिवशी झालेल्या या दोन कारवायांमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातून एक चारचाकी वाहन गावठी कट्टा घेऊन गांधली मार्गे अमळनेरकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी एपीआय गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, पोलीस कर्मचारी विनोद सोनवणे, मंगल भोई, उज्वल पाटील, मयुर पाटील आणि रवींद्र पाटील यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले. पोलिसांच्या पथकाने गांधली रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ सापळा रचला. काही वेळाने संशयित चारचाकी वाहन क्रमांक एमएच १७ बीयू ८८९४ येताना दिसले. पोलिसांनी वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये चार जण आढळून आले. यामध्ये सुरेश उत्तम भालेराव (वय ४४, हॉटेल मॅनेजर, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी, ता. राहता, जि. अहिल्यानगर), संदीप शांताराम गायकवाड (वय ३१, शेती, रा. गवडगाव, ता. येवला, जि. नाशिक), अनिल रघुनाथ कचरे (वय २८, चालक, रा. लक्ष्मीवाडी, सावळीविहीर, ता. राहता, जि. अहिल्यानगर) आणि बाबासाहेब नामदेव गायकवाड (वय २०, रा. पांझरवाडी, ता. येवला, जि. नाशिक) यांचा समावेश आहे. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि ६ हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत अटक केली. या कारवाईत चारचाकी वाहन, पिस्तूल व जिवंत काडतुसे असा एकूण ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३, २५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

 

भालेराव नगरात घरातून तलवार जप्त

 

दरम्यान, त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी शहरातील भालेराव नगर परिसरात आणखी एक कारवाई केली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, भालेराव नगर येथे देवा मनोज पथरोड (वय २०) याच्याकडे तलवार आहे.

माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस कर्मचारी सुनील तेली, मिलिंद सोनार आणि विनोद संदानशीव यांच्या पथकाला तपासणीसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी देवा मनोज पथरोड याच्या घराची तपासणी केली असता पलंगाच्या खाली तलवार आढळून आली. पोलिसांनी तलवार जप्त करून देवा मनोज पथरोड याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शस्त्र कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध अमळनेर पोलिसांनी एकाच दिवशी केलेल्या या दोन कारवायांमुळे शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. अवैधरीत्या गावठी कट्टे, पिस्तूल, तलवारी किंवा इतर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून यापुढेही कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *