
मानतेला जाणारी पिकअप व्हॅन उलटली; ११ जण जखमी, ६ जण धुळ्याला हलवले
अमळनेर (प्रतिनिधी) मानतेसाठी जाणारी पिकअप व्हॅन उलटून ११ जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जैतपिर येथे ३ मार्च रोजी रात्री ९.३७ वाजता घडली. त्यापैकी सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जैतपिर येथील वळणाजवळ गतिरोधक असून मानतेसाठी जाणाऱ्या पिकअप व्हॅनमध्ये २० ते २५ पेक्षा जास्त प्रवासी बसलेले होते. दरम्यान, समोरून ट्रक आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अचानक पिकअप व्हॅन उलटली. त्यामुळे सर्व प्रवासी खाली कोसळून जखमी झाले. या अपघातात अंकुश भगवान बागुल (वय २०, रा. वैजापूर ता. सिंदखेडा), राकेश प्रकाश मोरे (वय २०, रा. वैजापूर), बादल गुलाब भिल (वय १९, रा. मुडी), संजय बापू मोरे (वय २२), गणेश ताराचंद भिल (वय २१, रा. वैजापूर), मेलसिंग जयंसिंग कुवर (वय २२, रा. वैजापूर) यांना हात, पाय, पाठ व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले. तसेच विजय दिलीप पवार (वय २२), राकेश सुखराम भिल (वय २३), रोहित भिल (वय १८, रा. वैजापूर), नागेश मंगल भिल (वय २०, रा. ज्योयदा ता. शिरपूर) व सनी श्याम भिल (वय १८, रा. माळीच ता. शिरपूर) यांच्यावर अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलीस पाटील तसेच पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील व भरत गायकवाड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply