
अंतुर्ली-रंजाणे परिसरात बिबट्याची दहशत; वासरू व गोऱ्ह्यावर हल्ला
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंतुर्ली-रंजाणे परिसरातील नंदगाव शिवारालगतच्या घुंगऱ्या नाला भागात बिबट्याचा वावर असल्याचा संशय निर्माण झाला असून, १४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वासरू आणि गोऱ्ह्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळी आढळलेल्या ठशांवरून तसेच पंजाच्या खुणांवरून बिबट्याचा वावर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे वन अधिकारी गुलाब पिंजारी यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, १४ सप्टेंबर रोजी पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास घुंगऱ्या नाला परिसरात गायीचे वासरू आणि एका गोऱ्ह्यावर हल्ला झाल्याचे आढळून आले. सकाळी सात वाजता शेतकरी उमेश पारधी हे गोऱ्ह्यांना चारा-पाणी देण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
दरम्यान, काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार १० सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशीही याच परिसरात बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेश पारधी यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळी आढळलेल्या ठशांसह अन्य खुणांवरून बिबट्याचा वावर असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने परिसरात गस्त घातली; मात्र बिबट्या आढळून आला नाही. सायंकाळी पुन्हा या परिसरासह आजूबाजूच्या भागात गस्त घालण्यात येणार असून, बिबट्याच्या वावराच्या आणखी खुणा आढळल्यास कॅमेरा ट्रॅप लावण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.
बिबट्या एका ठिकाणी कायमस्वरूपी थांबत नसतो. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी. परिसरात बिबट्या अथवा त्याच्या वावराच्या खुणा आढळल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन अधिकारी गुलाब पिंजारी यांनी केले आहे.
पंचनामा व पाहणीच्या वेळी वन अधिकारी गुलाब पिंजारी, मनीषा मोरे आणि योगेश पाटील उपस्थित होते.

Leave a Reply