अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे साडेसतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक डंपर, एक ट्रॅक्टर तसेच मुरूम व वाळू जप्त करण्यात आली असून संबंधित चालक आणि मालकांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशानुसार वहिवाटीचा प्रश्न सोडविण्यासाठी गेलेल्या ग्राम महसूल अधिकारी योगेश बैसाणे, मंडळाधिकारी संजय चव्हाण आणि कोतवाल दत्तात्रय बोरसे यांना १ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिरूड–लोंढवे रस्त्यावर मुरूमाने भरलेला डंपर (क्रमांक एमएच ४७ ई ३३०५) येताना दिसला. पथकाने डंपर अडवून चौकशी केली असता चालक रामलाल बाबूलाल भिल (वय ४०, रा. लोंढवे) याच्याकडे मुरूम वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळले. चौकशीत डंपर मालकाचे नाव योगेश गुलाबराव नेरकर (रा. कन्हेरे) असल्याचे समोर आले. यानंतर मालक योगेश गुलाबराव नेरकर घटनास्थळी आला आणि चालकाकडून मुरूम रस्त्यावर खाली करून घेतल्यानंतर तेथून निघून गेला. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशानुसार १३ जुलै रोजी चालक व मालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत सुमारे १० लाख रुपयांचा डंपर आणि ५९ हजार रुपयांचा सुमारे पाच ब्रास मुरूम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई तालुक्यातील मठगव्हाण शिवारात करण्यात आली. मंडळाधिकारी विठ्ठल पाटील, ग्राम महसूल अधिकारी अनिल पवार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचारी गणेश पाटील, हितेश बेहरे आणि विनोद पाटील यांनी नदीपात्रातून वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ एएन ४४१०) अडवला. चौकशीदरम्यान चालक व मालक ज्ञानेश्वर भीमराव पवार यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत सुमारे सात लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *