
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हा अद्ययावत माहितीचा महत्त्वाचा स्रोत : आमदार अनिलदादा पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे आजच्या काळातील अद्ययावत माहितीचे प्रभावी साधन असून विद्यार्थी आणि शेतकरी या दोघांनीही या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार अनिलदादा पाटील यांनी केले.
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि एआयएसईसीटी-एचएएल कौशल्य रथ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विद्यार्थी बक्षीस समारंभ तसेच स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार सोहळा शुक्रवार, २५ जुलै रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल होते. प्रारंभी दानशूर प्रताप शेठजी, सरस्वती देवी, पूज्य साने गुरुजी आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन आमदार अनिलदादा पाटील, एआयएसईसीटी विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा, सीए नीरज अग्रवाल, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते श्यामकांत सनेर, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष कमल कोचर, ज्येष्ठ संचालक हरी वाणी, प्रदीप अग्रवाल आणि विश्वस्त वसुंधरा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एचएएल कौशल्य रथचे समन्वयक महेंद्र शिरसाठ यांनी केले. त्यांनी उपक्रमाचा उद्देश, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि कौशल्य विकासाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
एआयएसईसीटी विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बँकिंगची माहिती, ई-मेल आणि संकेतशब्द कुठेही निष्काळजीपणे देऊ नयेत, असे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि विविध प्रकल्प विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान आत्मसात करणे आता अपरिहार्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, सामाजिक न्याय विभाग, जळगावच्या प्रमुख कल्पना अहिरे, प्राचार्य हर्षवर्धन जाधव, चिटणीस पराग पंडित पाटील, सहचिटणीस व्ही. बी. मांटे, माहिती व तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ. वर्षा पाठक, संजीवनी गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना आमदार अनिलदादा पाटील म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आज काळाची गरज बनला आहे. चॅट जीपीटीसारख्या माध्यमांतून अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत आहे. या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला नाही, तर आपण स्पर्धेत मागे पडू. प्रशासन, शिक्षण आणि शेती या सर्वच क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक आहे. सामाजिक दायित्व निधीतून विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असून विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता प्रशिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनवावे. विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक व अधिक उत्पादनक्षम शेतीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षिका परिणिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर दीपक चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, प्रा. विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, प्रा. शशिकांत सोनवणे, प्रा. आर. सी. सरवदे, डॉ. माधव भुसनर, प्रा. नलिनी पाटील, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. जितेंद्र पाटील, डॉ. रवी बाळसकर, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, प्रा. नितेश कोचे, डॉ. अनिल झळके, डॉ. बालाजी कांबळे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक जाधव यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी मानले.
यांचा करण्यात आला गौरव
यावेळी आदर्श कृषी सन्मान पुरस्कार देऊन प्रकाश बडगुजर (गलवाडे), लिलाबाई ठाकूर (साळवे), किशोर पाटील (गांधली), बापूसाहेब देवरे (वलवाडी उपनगर, धुळे) आणि शरद सोनवणे (धरणगाव) यांचा गौरव करण्यात आला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रताप महाविद्यालयातील जयश्री वासुदेव पाटील, पूनम राहुल चौधरी, हर्षल महेंद्र नेरकर, कल्याणी कैलास बडगुजर, फाल्गुनी आनंदा महाजन, रिंकू अनिल साळी, भूमिका रितेश जैन, मयुरी किशोर पवार आणि वैष्णवी विलास पाटील या विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply