पावसाने महिनाभर दडी मारली; अमळनेर मतदारसंघ कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा : आमदार अनिलदादा पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांत गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याने शेतकरी संकटात सापडला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर व पारोळा तालुके कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था तसेच विविध वित्तीय संस्थांकडून पीक कर्ज घेतले आहे. शेतीच्या मशागतीपासून पेरणीपर्यंत मोठा खर्च केल्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जाचा वाढता भार आणि उत्पादनाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या परिस्थितीची तातडीने दखल घेण्यासाठी आमदार अनिलदादा पाटील यांनी शासनातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदने देऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांतील पावसाची स्थिती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती देण्यात आली. ‘‘शेतकरी अडचणीत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आपली प्राथमिकता आहे,’’ अशी भूमिका आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मांडली. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी

 

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे. तसेच दोन्ही तालुक्यांना कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ द्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पीक नुकसानभरपाईसह शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आवश्यक शासकीय सवलती आणि विविध योजनांचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *