
रामेश्वर येथे घरफोडी; कुलूप तोडून ६० हजारांचा ऐवज लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील रामेश्वर येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १७ जूनच्या रात्री ते १८ जूनदरम्यान घडली. याप्रकरणी फिर्याद उशिराने दाखल झाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्तुराबाई साहेबराव वंजारी (वय ६५) या काही कामानिमित्त गावाबाहेर गेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे २० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोथ, १० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, २० हजार रुपये किमतीचे २० भार चांदीचे गोट तसेच ८ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चोरीस गेलेल्या ऐवजाची खात्री करून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
फिर्याद उशिराने दाखल झाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत असून, परिसरातील संशयितांची माहिती, उपलब्ध पुरावे तसेच इतर बाबींच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply