
साने गुरुजी बालवाडीत पालक मेळावा उत्साहात; ‘मातीकाम’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी बालवाडी विभागात १५ जुलै रोजी पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी पालक आणि शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी ‘मातीकाम’ (क्ले ॲक्टिव्हिटी) अंतर्गत तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले असून त्याला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सचिव घोरपडे, सहसचिव ॲड. बाविस्कर, कार्यसदस्य पत्रकार किरण पाटील, सर्व संचालक मंडळाचे सदस्य, बालवाडीच्या मुख्याध्यापिका शिंगाने मॅडम, सर्व शिक्षिका तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
मेळाव्यात पालक, शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणत्या उपक्रमांची आवश्यकता आहे, त्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक विकासासाठी शाळा व पालकांनी परस्पर समन्वयाने कसे कार्य करावे, यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. पालकांनीही शाळेचे शैक्षणिक वातावरण, व्यवस्थापन आणि शिक्षकांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
यावेळी बालवाडीतील चिमुकल्यांनी ‘मातीकाम’ उपक्रमांतर्गत मातीपासून विविध फळे, फळभाज्या, भांडी तसेच इतर आकर्षक वस्तू तयार करून सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कलागुणांचे उपस्थित मान्यवर व पालकांनी भरभरून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
पालकांचा सक्रिय सहभाग, शिक्षकांचा उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेमुळे हा पालक मेळावा आगळावेगळा ठरला. शांत, आनंदी आणि सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे पालक-शिक्षकांमधील संवाद अधिक दृढ झाला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

Leave a Reply