राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश राजमल जैन यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी)  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यापारी आघाडीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी शहरातील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश राजमल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेर शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी प्रकाश राजमल जैन यांची व्यापारी आघाडीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. यानंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नियुक्तीप्रसंगी शहराध्यक्ष चेतन राजपूत, कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर, जितेंद्र ठाकुर, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस संदीप जैन, निलेश महाजन, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश राजमल जैन हे अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध महावीर आईस्क्रीमचे संचालक असून ते गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. व्यापारी वर्गामध्ये त्यांचा चांगला संपर्क आणि विश्वास असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे व्यापारी आघाडीचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर प्रकाश राजमल जैन यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “व्यापारी बांधवांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहोचविणे, व्यापाऱ्यांच्या विविध समस्या पक्ष नेतृत्वापर्यंत मांडणे आणि व्यापारी आघाडीचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार,” अशी ग्वाही दिली.

या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापारी आघाडीला अमळनेर शहरात नवे बळ मिळणार असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *