
गांधली येथे खरकटे पाणी अंगावर फेकल्याच्या वादातून तिघांवर हल्ला; तीक्ष्ण हत्यार व विटांनी केली मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) उष्टे-खरकटे पाणी अंगावर फेकल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन तिघांना तीक्ष्ण हत्यार व विटांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना ६ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गांधली परिसरात घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल सुरेश कोळी (रा. गांधली, अमळनेर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, ६ मे रोजी रात्री ते आपल्या म्हशींना चारा-पाणी करण्यासाठी गोठ्यात गेले होते. त्यावेळी गोठ्याशेजारी राहणाऱ्या संगीता संतोष पाटील या घराबाहेर भांडी घासत असताना त्यांनी खरकटे पाणी अतुल कोळी यांच्या अंगावर फेकले.
याबाबत जाब विचारण्यासाठी अतुल कोळी त्यांच्याकडे गेले असता, “ही आमची जागा आहे,” असे म्हणत संगीता पाटील यांनी शिवीगाळ सुरू केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर अतुल यांनी घरी जाऊन आई-वडील, भाऊ व वहिनी यांना घडलेला प्रकार सांगितला. रात्री सुमारे ९ वाजता संबंधितांना समजावण्यासाठी कुटुंबीय त्यांच्या घरी गेले असता, संगीता पाटील, त्यांचे पती संतोष दोधु पाटील व मुलगा जयेश संतोष पाटील यांनी शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी जयेश पाटील याने तीक्ष्ण हत्याराने अतुल कोळी व त्यांचा भाऊ नवल कोळी यांच्यावर वार केल्याने दोघे जखमी होऊन खाली पडले. तसेच संगीता पाटील यांनी अतुल यांच्या वहिनीला विटांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी तिघांनी उपचार घेतल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

Leave a Reply