
प्रतापच्या सेवानिवृत्त प्राध्यापकांचा आज स्नेहमेळावा; जुन्या आठवणींना मिळणार उजाळा
अमळनेर (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्रातील अग्रेसर प्रताप महाविद्यालयातील ज्युनिअर व सीनिअर विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापकांचा स्नेहमेळावा आज, ९ ऑगस्ट रोजी प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात दीर्घकाळ एकत्र काम केलेले सहकारी प्राध्यापक पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.
या स्नेहमेळाव्याची संकल्पना प्रा. प्रभाकर जोशी, प्रा. अशोक जैन, प्रा. दिलीप भावसार, प्रा. जयेश गुजराथी, प्रा. मनोहर बडगुजर आणि प्रा. ई. टी. चौधरी यांच्या पुढाकारातून साकारली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रताप शेठजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीने होणार आहे. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील राहणार असून, माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी प्रमुख अतिथी असतील. प्रा. पी. टी. धर्माधिकारी, प्रा. सुभाष सोमाणी, प्रा. एस. आर. पाटील आणि प्रा. सुधीर पाटील महाविद्यालयातील सोनेरी आठवणींना उजाळा देणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप भावसार आणि प्रा. जयेश गुजराथी करणार असून, तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक प्रा. मनिष करंजे यांचे सहकार्य लाभत आहे. सेवानिवृत्त प्राध्यापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. प्रभाकर जोशी, सचिव प्रा. दिलीप भावसार, खजिनदार प्रा. जयेश गुजराथी यांच्यासह कार्यकारी मंडळाने केले आहे.

Leave a Reply