फरशी रोडसह अमळनेरात सर्वत्र व्हॉल्व चेंबरमध्ये दूषित पाणी; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अमळनेर (प्रतिनिधी) फरशी रोड परिसरातील तथागत गौतम बुद्ध विहाराजवळील जलवाहिनीच्या व्हॉल्व चेंबरमध्ये दूषित व खराब पाणी साचल्याचे समोर आले असून, अमळनेर शहरातील सर्वच भागांमध्ये व्हॉल्व चेंबरच्या अस्वच्छतेची अशीच स्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणीपुरवठ्यावेळी चेंबरमधील साचलेले दूषित पाणी जलवाहिनीत मिसळण्याची शक्यता असल्याने नळाद्वारे मिळणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्हॉल्व चेंबरची तातडीने पाहणी करून स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

अमळनेर शहरातील फरशी रोडलगत तथागत गौतम बुद्ध विहाराच्या बाजूस असलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्व चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर खराब पाणी साचून राहिल्याचे निदर्शनास आले आहे. चेंबरमधील पाण्याला दुर्गंधी येत असून, पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर व्हॉल्वच्या माध्यमातून हे दूषित पाणी जलवाहिनीत मिसळण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंध येत असल्याची तक्रार आहे. फरशी रोडवरील ही स्थिती शहरातील इतर भागांतील व्हॉल्व चेंबरचीही अवस्था अधोरेखित करणारी आहे. शहरातील विविध भागांमध्ये जलवाहिनीवरील व्हॉल्व चेंबरमध्ये पाणी, गाळ व घाण साचून राहत असल्याने त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नळाद्वारे मिळणारे पाणी पिण्यासह स्वयंपाक आणि दैनंदिन घरगुती वापरासाठी घेतले जात असल्याने पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दूषित किंवा सूक्ष्मजीवांनी बाधित पाण्याचा पिण्यासाठी अथवा स्वयंपाकासाठी वापर झाल्यास जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे जलवाहिनीवरील व्हॉल्व चेंबर स्वच्छ व सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. चेंबरमध्ये साचलेले पाणी, गाळ आणि अन्य घाण नियमितपणे काढणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील सर्व भागांतील जलवाहिनीच्या व्हॉल्व चेंबरची पाहणी करावी. चेंबरमध्ये साचलेले दूषित पाणी बाहेर काढून गाळ व घाण पूर्णपणे साफ करावी, तसेच जलवाहिनी व व्हॉल्वची आवश्यक तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वी व्हॉल्व चेंबरची स्वच्छता करून पाण्याच्या गुणवत्तेची खात्री करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे नगरपरिषदेने गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील सर्व भागांमध्ये आवश्यक स्वच्छता व तपासणीची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *