
पोलिसांच्या तणावपूर्ण जीवनात हास्य-काव्याची मैफल
खान्देश कन्या’ गुंजन पाटील यांचा ४ ऑक्टोबरला विशेष कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी )कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना तणावपूर्ण दिनचर्येतून काही क्षण विरंगुळ्याचे मिळावेत, यासाठी ‘खान्देश कन्या’ कु. गुंजन पाटील यांच्या विशेष हास्य-काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्टेशन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ही मैफल रंगणार आहे.
कर्तव्याच्या धावपळीत पोलिसांना स्वतःसाठी वेळ मिळणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे हास्य, काव्य आणि मनोरंजनाच्या माध्यमातून काही काळ तणाव दूर करून आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुंजन पाटील यांच्या खास शैलीतील काव्य सादरीकरणातून उपस्थितांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मदत व पुनर्वसन मंत्री आमदार अनिल पाटील राहणार असून, कृषिभूषण साहेबराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, डॉ. अविनाश जोशी (अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ), लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, अमळनेर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. ‘काव्य संध्या मैफिल आयोजक समिती’च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. पोलीस अधिकारी-कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हास्य-काव्य मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमळनेर शहर व तालुक्याला समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली असून, महाराष्ट्राची लोकधारा जपण्याचे कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकी संघाचे संचालक विक्रांत भास्करराव पाटील, जयनील फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष वरुण पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील भोई, भूषण महाजन, विजय राजपूत, अक्षय साळी, यश वर्मा तसेच कवी शरद धनगर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Leave a Reply