
रोटरी क्लब अमळनेरतर्फे आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी
अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब अमळनेरतर्फे पी. बी. ए. इंग्लिश मिडियम शाळा परिसरातील रोटरी सभागृहात आयोजित करण्यात आलेली भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. अमळनेर शहरासह परिसरातील विविध शाळांमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा आणि कलागुणांचा प्रभावी आविष्कार सादर केला.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रल्हाद सोनार (शिरपूर) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रकलेतील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलेद्वारे समाजाशी जोडले जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्पर्धेत इयत्तेनुसार विविध विषय देण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव, देशप्रेम, निसर्गसौंदर्य तसेच दैनंदिन जीवनाशी निगडित विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक व आशयघन चित्रे रेखाटली. परीक्षकांनी प्रत्येक चित्राचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली.
स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी देवांग शाह आणि डॉ. शरद बाविस्कर यांनी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पालवे यांनी केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले. सचिव प्रशांत निकम यांनी सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच सहकाऱ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवांग शाह, महेश पाटील, डॉ. शरद बाविस्कर, किर्ती कोठारी, पूनम कोचर, रोहित सिंघवी, सनी कोठारी, सचिन कोठावडे, ईश्वर सैनानी, अजय रोडगे, प्रतीक जैन आणि चेलाराम सैनानी यांच्यासह रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रताप हायस्कूलचे डी. एन. पालवे, सेंट मेरी इंग्लिश मिडियम स्कूलचे दिलीप पाटील, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या मयुरी बनसोले व प्रियंका परदेशी, न्यू व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूलच्या गायत्री बारी, अँड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे गणेश लोहार तसेच डी. आर. कन्या शाळेचे किरण पाठक यांनी विशेष सहकार्य केले.
स्पर्धेतील ४०० हून अधिक सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सहभाग प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब अमळनेरतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply