
अमळनेरचा कत्तलखाना बंद करण्यासाठी आज जनआक्रोश आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेमार्फत चालविण्यात येणारा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून तो जमीनदोस्त करावा, यासह विविध सात प्रमुख मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतर नगरपालिका आवारात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी १० वाजता तिरंगा चौकातून जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात होईल. हे आंदोलन नगरपालिकेवर धडकणार असून, त्यानंतर नगरपालिका आवारातच बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. कत्तलखाना जमीनदोस्त करावा, परवानाधारक व दोषींवर कठोर कारवाई करावी, गोवंश हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी, शेतकऱ्यांचे चोरीला जाणारे गोवंश शोधण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, अशा सात प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. या गंभीर विषयांवर प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply