
“बोला सखाराम महाराज की जय” च्या जयघोषात अमळनेरात उसळला भक्तिभावाचा महासागर !
राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी पवित्र सोहळ्यास लावली हजेरी
अमळनेर (प्रतिनिधी) “बोला सखाराम महाराज की जय” या जयघोषाने दुमदुमलेल्या वातावरणात वैशाख शुद्ध पौर्णिमेनिमित्त १ मे रोजी संत सखाराम महाराज यात्रोत्सवाची भव्य पालखी मिरवणूक अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून भक्तीचा अनोखा अनुभव घेतला.
यात्रोत्सवानिमित्त परंपरेनुसार सकाळी हभप प्रसाद महाराज यांनी वाडी संस्थानमध्ये लालजी तसेच विठ्ठल-रुख्मिणीची पूजा केली. त्यानंतर नदीत समाधीचे दर्शन घेऊन लालजींची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली आणि मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालखीच्या अग्रभागी भालदार-चोपदार घोड्यावर स्वार होते, तर संत सखाराम महाराजांचा ट्रॅक्टरवर सजवलेला भव्य पुतळा, गरुड-हनुमान यांच्या प्रतिमांचे रथ, राम-लक्ष्मण-सीता-हनुमान यांचा सजीव देखावा, नगारखाना, तांबेपुरा जागृत हनुमान मित्र मंडळाचे लेझीम पथक आणि भुसावळ येथील रेल्वे बँड यामुळे मिरवणुकीला अलौकिक शोभा प्राप्त झाली होती. पालखीच्या मागे संतांच्या चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या, तर हभप प्रसाद महाराज अनवाणी चालत भाविकांना खडीसाखरेचा प्रसाद वाटत होते. दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची लांबलचक रांग लागली होती. वाडी चौक, राज होळी चौक, पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोड असा मार्गक्रमण करत मिरवणूक बोरी पुलावरून पैलाड येथे पोहोचली. तेथे ढोल-ताशांच्या गजरात आणि चाळीसगावच्या सद्गुरू बँडच्या सुरेल निनादात पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
रात्री उशिरा पालखी समाधी स्थळावर पोहोचल्यावर हभप प्रसाद महाराजांनी समाधीसमोर अभंग गात वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर परंपरेप्रमाणे प्रथम शिष्य मोहन बेलापूरकर महाराज यांच्यावर आणि नंतर भाविकांवर गुलाल उधळण्यात आला. अंगावर गुलाल पडणे म्हणजे पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाल्याची भावना मनात बाळगून भाविक आनंदाने न्हाऊन निघाले. मिरवणुकीदरम्यान ओम लहरी भजनी मंडळ, कुसुमाई बिझनेस ग्रुप, लायन्स क्लब, राजे संभाजी मित्र मंडळ, जैन सोशल ग्रुप यांसह विविध मंडळांनी भाविकांसाठी प्रसाद, लस्सी, ताक, सरबत आणि थंडपेयांचे वाटप करून सेवाभाव जपला. या सोहळ्यात खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम तसेच विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मिरवणूक मार्गावर पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवत कार्यक्रम सुरळीत पार पाडला.
संत सखाराम महाराजांच्या नामस्मरणात रंगलेल्या या पालखी सोहळ्याने अमळनेर नगरीत भक्ती, आनंद आणि एकात्मतेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.
तब्बल १३ ते १४ तास कडक उन्हात अनवाणी चालले प्रसाद महाराज
तब्बल १३ ते १४ तास कडक उन्हात अनवाणी चालूनही प्रसाद महाराजांनी आनंदाने नृत्य करत आकाशाकडे पाहून देवांना वाकोल्या दाखवल्या. “आम्ही पृथ्वीवरही आनंदाने जगतो आहोत” हा संदेश देणारी ही परंपरा भाविकांच्या मनाला स्पर्शून गेली.

Leave a Reply