
अमळनेरमध्ये दहा कोटींचे मिनी मंत्रालय प्रगतीपथावर; ग्रामीण विकासाचा नवा अध्याय
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात धुळे रोडलगत मध्यवर्ती भागात उभारण्यात येत असलेल्या पंचायत समितीच्या (तालुकास्तरीय मिनी मंत्रालय) आधुनिक प्रशासकीय दुमजली इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे १० कोटी रुपयांच्या खर्चातून साकारत असलेली ही भव्य इमारत येत्या तीन महिन्यांत पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या मिनी मंत्रालयात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषी, महिला व बालविकास आदी विभागांसाठी स्वतंत्र व प्रशस्त हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र दालनांची सोय करण्यात येत आहे.
इमारतीमध्ये सुसज्ज व आधुनिक सुविधांनी युक्त मोठा मीटिंग हॉल, अभ्यागतांसाठी स्वतंत्र वेटिंग रूम यांचाही समावेश आहे. नागरिकांना अधिक कार्यक्षम व सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने ही रचना करण्यात आली आहे.
याशिवाय स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सौर ऊर्जा यंत्रणा तसेच अत्याधुनिक अग्निसुरक्षा उपाययोजना देखील या इमारतीत करण्यात येत आहेत.
तालुक्यातील ग्रामीण विकास प्रक्रियेला गती देणारे हे ‘मिनी मंत्रालय’ लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply