जनगणना २०२७ साठी प्रशिक्षणाला सुरुवात; दोन टप्प्यांत प्रशिक्षण सत्रांचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) भारत सरकारच्या जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्रगणक (इन्युमरेटर), पर्यवेक्षक (सुपरवायझर) तसेच राखीव कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणामुळे आगामी जनगणना प्रक्रिया अधिक प्रभावी आणि सुस्थितीत पार पाडण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे.

हे प्रशिक्षण दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आले असून पहिला टप्पा २३ ते २५ एप्रिल आणि दुसरा टप्पा २७ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. अमळनेर येथील ग्लोबल व्ह्यू स्कूल येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रशिक्षण सत्रे घेतली जात आहेत. या प्रशिक्षणात सुमारे ५५० ते ६०० कर्मचाऱ्यांचा सहभाग असून ८ मास्टर ट्रेनरमार्फत त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. प्रशिक्षणामध्ये जनगणना अधिनियम १९४८ व जनगणना नियम १९९० तसेच जनगणना संचालनालयाच्या निर्देशांनुसार विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले असून गैरहजेरी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशिक्षणासाठीचे नियुक्ती आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने देण्याचे तसेच त्याची पोहोच सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रशिक्षणादरम्यान सहभागी कर्मचाऱ्यांसाठी चहा व दुपारच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जनगणना २०२७ ची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरत असून तालुक्यातील यंत्रणा सज्ज करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *