
रिवा येथील जैन साध्वींच्या मृत्यू प्रकरणी अमळनेर जैन समाज आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर येथील समस्त जैन समाजाने रिवा येथे दोन जैन आर्यिका माताजींच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ समाजबांधवांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना उद्देशून तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करत दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास रिवा जिल्ह्यात पायी विहार करत असताना १०५ आर्यिका श्रुतमणी माताजी व १०५ आर्यिका उपशममाताजी यांना भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात एका साध्वीजींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या साध्वीजींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरातील जैन समाजात हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा केवळ अपघात नसून हेतुपुरस्सर घडवून आणलेला प्रकार असू शकतो, असा गंभीर संशय जैन समाजाने व्यक्त केला आहे. यापूर्वीही विविध ठिकाणी साधू-संतांवर झालेल्या घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अमळनेर जैन समाजाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, तसेच भविष्यात साधू-संतांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. राज्य व केंद्र शासनाने या प्रकरणात संवेदनशीलता दाखवत न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या निवेदनावेळी जैन समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, संघपती व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply