अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणी आरोपीला सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल; पीडित कुटुंबाला नुकसान भरपाईचे आदेश

 

अमळनेर (प्रतिनिधी)  चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड मारून खून करणाऱ्या आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुण्या बारेला (वय २२, रा. बालवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, हल्ली मुक्काम पाटचारी, चोपडा) याला अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलीचे वडील विरवाडे परिसरातील शेती निमबटाईने करीत होते. त्यांनी आपल्या चार मुलींना शेतात निंदणीच्या कामासाठी पाठवले होते. त्या शेताजवळील गोलबर्डी गावात आरोपीच्या बहिणीचे वास्तव्य असल्याने आरोपीचा मुलींशी परिचय होता. ७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी पीडितेच्या तीन बहिणी घाबरलेल्या अवस्थेत घरी परतल्या व त्यांनी आईला सांगितले की आरोपी अंकेश बारेला त्यांचा पाठलाग करत होता आणि त्याने एका बहिणीला वाघ्या नाला परिसरात ओढून नेले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी शोध घेतला असता भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीच्या शेतात पीडित मुलगी नग्न अवस्थेत आढळून आली. तिच्या डोक्यावर गंभीर जखम होती. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड तसेच रक्ताचे डाग आढळून आले.

पोस्टमार्टेम अहवालात आरोपीने अत्याचारादरम्यान पीडितेचा पाय मोडल्याचे तसेच अत्याचारानंतर तिला सुमारे १०० मीटर अंतरावर ओढत नेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६५, ६६, १०१(३) तसेच बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला ८ सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली होती.

या खटल्याची सुनावणी अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी वकील ॲड. के. आर. बागुल यांनी १४ साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरी दाभाडे, डॉ. चंद्रहास पाटील, पवन पाटील, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, कावेरी कमलाकर तसेच पोलिस उपनिरीक्षक वलटे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, कपडे आणि चपलांवरील रक्ताचे डीएनए तपासणी अहवालही न्यायालयाने ग्राह्य धरले.

न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम ६५, १०३(१) आणि पॉक्सो कायद्यान्वये दोषी ठरवत नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना ३० हजार रुपये द्यावेत आणि शासनाने पीडित कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत द्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.

खटल्यादरम्यान आरोपी न्यायालयीन कोठडीत होता. निकालानंतर त्याला जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय उदयसिंग साळुंखे, हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, पुरुषोत्तम वालडे, राहुल रणधीर, सतीश भोई आणि भरत ईशी यांनी सहकार्य केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *