सासूने किडनी देत जावयाला दिले जीवनदान; जावयासाठी आईचे काळीजही ठरले मोठे

अमळनेर (प्रतिनिधी) दोन्ही किडन्या निकामी झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या जावयाचे प्राण वाचवण्यासाठी सासूने स्वतःची एक किडनी दान केल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. अमळनेर येथील रहिवासी सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील यांच्या पत्नी सुशीलाबाई यांनी धाडसी निर्णय घेत जावई ॲड. अतुल रमेश चव्हाण यांना किडनी दान केली. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने सुशीलाबाई यांनी आपल्या जावयाला नवजीवन दिले असून, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अमळनेर येथील रहिवासी सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील आणि त्यांच्या पत्नी सुशीलाबाई यांच्या कन्या कविता यांचा विवाह म्हसावद येथील ॲड. अतुल रमेश चव्हाण यांच्याशी झाला आहे. कविता या नाशिक ग्राहक न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत, तर ॲड. अतुल रमेश चव्हाण हे नामांकित कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी ॲड. अतुल रमेश चव्हाण यांना आजाराने ग्रासले. तपासणीनंतर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने डायलिसिस सुरू करण्यात आले. मात्र, दीर्घकाळ डायलिसिसवर राहण्यापेक्षा किडनी प्रत्यारोपण हाच पर्याय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले. किडनी दाता मिळणे ही मोठी अडचण होती. दाता मिळाल्यानंतरही त्याची किडनी रुग्णाशी जुळणे आवश्यक असल्याने कुटुंबीय चिंतेत होते. अशा परिस्थितीत सुशीलाबाई यांनी पुढाकार घेतला. ‘एक किडनी असतानाही माणूस निरोगी आयुष्य जगू शकतो. आपली एक किडनी जावयाला दिल्याने त्याचे प्राण वाचतील आणि आपल्या मुलीचे वैवाहिक जीवनही सुरक्षित राहील,’ असा विचार करून त्यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक येथील नाईन पर्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे सुशीलाबाईंनी आपली इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सुशीलाबाई आणि ॲड. अतुल रमेश चव्हाण यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. तपासण्यांमध्ये सुशीलाबाईंची किडनी जावयाशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी आपली एक किडनी जावई ॲड. अतुल रमेश चव्हाण यांना दान केली.

मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टर अमोल कुमार पाटील, डॉ. नागेश आघोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वैद्यकीय पथकाने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर ॲड. अतुल रमेश चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

जावयाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची किडनी देण्याचा सुशीलाबाईंचा निर्णय केवळ वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचा नसून सासू-जावयाच्या नात्यातील माणुसकी आणि जिव्हाळ्याचेही उदाहरण ठरला आहे. मुलीचे संसारजीवन अबाधित राहावे आणि जावयाला जीवनदान मिळावे, या भावनेतून त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नातेवाईक आणि समाजातून सुशीलाबाई यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *