
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलिसांचा रूट मार्च
अमळनेर (प्रतिनिधी) : आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील संवेदनशील भागांत सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११.२० वाजेच्या दरम्यान पोलिसांनी रूट मार्च काढला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा रूट मार्च घेण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत शहरातील विविध संवेदनशील भागांतून हा रूट मार्च काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली डी. पी., आखाडा मकान, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक आणि गांधलीपुरा चौकी परिसरातून पोलिसांनी संचलन केले. या रूट मार्चमध्ये अमळनेर पोलीस ठाण्याकडील ६ अधिकारी व ४८ अंमलदार, मारवड पोलीस ठाण्याकडील २ अधिकारी व १५ अंमलदार, एरंडोल पोलीस ठाण्याकडील १ अधिकारी व १० अंमलदार, धरणगाव पोलीस ठाण्याकडील १ अधिकारी व ३ अंमलदार, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याकडील ३ अंमलदार तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याकडील ३ अंमलदार सहभागी झाले. याशिवाय पोलीस मुख्यालयाकडील ३ दंगा नियंत्रण पथके आणि १ क्यूआरटी पथकही रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. अशा प्रकारे एकूण ११ अधिकारी व १२५ अंमलदारांचा सहभाग होता. तसेच पोलीस मुख्यालय, जळगावकडील बँड पथकही यावेळी उपस्थित होते. ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, संवेदनशील भागांत पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

Leave a Reply