बाजार ओट्यांचे भूमिपूजन, शिवसेना संपर्क कार्यालयाचे आज लोकार्पण

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील आठवडे बाजाराच्या ओट्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या अमळनेर विधानसभा शिवसेना संपर्क कार्यालयाचे लोकार्पण २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

अमळनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील फायनल प्लॉट क्रमांक १२३ मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आठवडे बाजाराचे ओटे बांधण्यात येणार आहेत. या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे रोडवरील शिवांश बिझनेस हब येथे अमळनेर विधानसभा शिवसेना संपर्क कार्यालय सुरू करण्यात येत असून, या कार्यालयाचे लोकार्पणही याचवेळी होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना उपनेत्या सरिता माळी (कोल्हे), शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील आणि पारोळा लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय स्थानिक सभापती, गटनेते, नगरसेवक व मुख्याधिकारी यांचीही उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी आजी-माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, पदाधिकारी, शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि व्यापारी बांधवांनी फायनल प्लॉट क्रमांक १२३ तसेच शिवांश बिझनेस हब, धुळे रोड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील आणि शहरप्रमुख विलास कंखरे यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *