
लोकवर्गणीतून साकारला एक ते दीड किलोमीटरचा रस्ता
चिमनपुरी पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे लोकसहभागातून एक ते दीड किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण शेतरस्ता तयार करण्यात आला आहे. ग्रामपंचायत, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावातील शेत परिसरात जाणारा हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक, शेतीची मशागत आणि दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणी, श्रमदान आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी स्वेच्छेने आर्थिक योगदान देत कामात सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदस्य संतोष बापू चौधरी, माजी उपसरपंच गोकुळ पाटील, साहेबराव आनंदा पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने केवळ काही दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. या रस्त्यामुळे शेतातील वाहतूक सुलभ झाली असून ट्रॅक्टरद्वारे शेणखत, बियाणे आणि शेतमालाची ने-आण करणे सोपे झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या उपक्रमामुळे शेती उत्पादन वाढीसही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या यशस्वी लोकसहभागी उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातही अशाच विकासकामांसाठी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply