
अमळनेरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; बजरंग दलाचे पोलीस प्रशासन व नगरपरिषदेला निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि वाढत्या जनावरे चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विश्व हिंदू परिषद – बजरंग दल च्या वतीने पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर मोकाट गायी वासरांना जन्म देत असून, या लहान वासरांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होत आहेत. गेल्या आठवडाभरात अशा घटनांमध्ये ५ वासरांचा मृत्यू झाला असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचा संताप निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जनावरे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. प्रशासनाला दिलेल्या या निवेदनावर बजरंग दलाचे संजय शहा (प्रखंड अध्यक्ष), सचिन चौधरी (प्रखंड मंत्री), सचिन महाजन (प्रखंड संयोजक), नरेश शामराव पाटील, नरेश आहुजा, योगराज चव्हाण, पवन बुरी, विजय गंभीर वारी, अमोल उत्तम महाजन, विजय धनराज पाटील, सागर वारी, परेश उदेवाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रमुख मागण्या अशा
मोकाट जनावरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. जनावरे चोरीच्या प्रकरणांचा सखोल तपास करून दोषींना अटक करावी. जनावरांच्या मालकांना ४ दिवसांत जनावरे गोठ्यात बांधण्यासाठी जाहीर नोटीस द्यावी. मुदतीनंतर रस्त्यावर दिसणारी जनावरे नगरपरिषदेने जप्त करून कोंडवाडा किंवा गोशाळेत जमा करावीत.

Leave a Reply