
जनगणना २०२७ साठी अमळनेरमध्ये प्रगणकांचे प्रशिक्षण सुरू; १ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग
अमळनेर (प्रतिनिधी) भारत सरकारच्या जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्रगणक (पर्यवेक्षक) तसेच राखीव कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारपासून अमळनेर शहरातील सायरादेवी बोहरा सेंट्रल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. हे प्रशिक्षण २८ ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी यात सहभागी झाले आहेत.
या प्रशिक्षणात सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग असून त्यांना १ मास्टर ट्रेनर व ४ फिल्ड ट्रेनर यांच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. जनगणना प्रक्रियेतील अचूक माहिती संकलन, डिजिटल नोंदणी, घरगुती सर्वेक्षण पद्धती तसेच शासकीय सूचनांचे पालन याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणास उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे कर्मचारी वेळेवर उपस्थित राहून प्रशिक्षण घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी शिक्षकांसाठी चहा व दुपारच्या जेवणाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी भेट दिली. तसेच उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, संतोष केदारे, रामोळे यांच्यासह इतर अधिकारी दिवसभर प्रशिक्षणस्थळी उपस्थित राहून नियोजनावर लक्ष ठेवत होते. या प्रशिक्षणामुळे जनगणना २०२७ मोहिमेची तयारी अधिक प्रभावीपणे होणार असून अचूक व विश्वासार्ह माहिती संकलनास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply