
भारत-अमेरिका करार रद्द करा; मका-ज्वारी एमएसपी उद्दिष्ट वाढवा
राष्ट्रीय किसान काँग्रेसने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय शेतकऱ्यांचा माल अमेरिकेत निर्यात झाल्यानंतर त्यावर १८ टक्के कर आकारला जात आहे. हा करार देशाच्या अन्नसुरक्षेलाही धोका निर्माण करणारा असल्याने भारत-अमेरिका आयात-निर्यात करार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय किसान काँग्रेस तर्फे करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना देण्यात आले.
राष्ट्रीय किसान काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने अमेरिकेबरोबर केलेला आयात-निर्यात करार हा भारतीय शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असून देशाच्या अन्नसुरक्षेलाही धोका निर्माण करणारा आहे. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या शेतीमालावर शून्य टक्के कर आकारला जातो, तर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या शेतीमालावर १८ टक्के जीएसटी लावला जातो, ही बाब शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या करारामुळे कापूस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याचा धोका असून दूध उत्पादक व दुग्ध व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित करार रद्द करावा, भारतीय शेतीमालावरील कर हटवावेत, आयात नियंत्रणाचे कठोर धोरण लागू करावे तसेच सर्व शेतीमालाला कायदेशीर हमीभाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर तालुक्यातील मका व ज्वारी खरेदीच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) उद्दिष्टात वाढ करावी, या मागणीचे स्वतंत्र निवेदनही देण्यात आले. अमळनेर तालुक्याला देण्यात आलेले खरेदी उद्दिष्ट अत्यंत तोकडे व अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यात लाखो हेक्टर क्षेत्रावर मका व ज्वारीची लागवड केली जाते. खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामातही मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मात्र शासनाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट कमी असल्याने शेतकऱ्यांना आपला माल कमी दरात व्यापाऱ्यांना विकावा लागत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तालुक्यातील प्रत्यक्ष लागवडीचे क्षेत्र व उत्पादन लक्षात घेऊन खरेदी उद्दिष्ट वाढवावे, अशी मागणी जिल्हा कार्याध्यक्ष पाटील, प्रा. दिनेश पवार, सुरेश पिरन पाटील, सुनील भालेराव पाटील, प्रताप नगराज पाटील, किशोर संतोष पाटील, नारायण झोपडू पाटील आदी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply