अमळनेरात पथदिव्यांसाठी ५० टायमर बसवणार; वीज बिलात बचत अपेक्षित

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदने शहरातील पथदिवे सुरू व बंद होण्यामधील तफावत दूर करण्यासाठी आणि विजेच्या वाढत्या बिलावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात ५० टायमर बसवण्यात येणार आहेत.

सध्या अमळनेर शहरात सुमारे ६ हजार ५०० पथदिवे असून ते सुरू-बंद करण्यासाठी ५० पॉइंट्स कार्यरत आहेत. या कामासाठी दोन कामगारांची नेमणूक करण्यात आली असली तरी शहराचा विस्तार सुमारे तीन चौरस किलोमीटरपर्यंत असल्याने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागत होता. परिणामी काही ठिकाणी दिवे वेळेआधीच सुरू होत होते, तर काही भागात अंधार पडल्यानंतरही दिवे लागण्यास उशीर होत होता. सकाळीही दिवे उशिरा बंद होत असल्याने विजेचा अपव्यय होऊन बिल वाढत होते. काही ठिकाणी दिवसा दिवे सुरू ठेवणे किंवा वीज चोरीचे प्रकारही घडत होते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे तसेच सर्व नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या असलेले १५० पॉइंट्स ५० पॉइंटमध्ये रूपांतरित करून प्रत्येक ठिकाणी टायमर बसवण्यात येणार आहेत. यामुळे सर्व पथदिवे एकाच वेळी सुरू व बंद होतील आणि प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित होईल. परिणामी मानवी हस्तक्षेप कमी होऊन मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारीनुसार अनेक ठिकाणी पथदिवे योग्य प्रकारे बसवले नसल्याने प्रकाश व्यवस्थित पडत नव्हता. त्यामुळे प्रत्येक खांबावर पाईप क्लॅम्प बसवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

 

पैलाड भागातील चार पॉइंटवर प्रयोग

 

पालिकेने सुरुवातीला पैलाड भागातील चार पॉइंटवर हा प्रयोग केला असता प्रत्येक पॉइंटवर पाच ते सहा हजार रुपयांची वीज बचत झाली आहे. तसेच दिवे सुरू-बंद करण्याचे कष्टही कमी झाले आहेत.”

कुणाल महाले, विद्युत अभियंता, नपा अमळनेर

 

ऊर्जा बचतीसाठी सातत्याने प्रयत्न

 

पालिकेने यापूर्वी सीएसआर फंडातून सोलर प्रकल्प राबवून नगरपरिषद कार्यालयाचे वीज बिल शून्यावर आणले आहे. ऊर्जा बचतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.”

गणेश शिंदे, मुख्याधिकारी, नपा अमळनेर

 

५० टायमर बसवण्याचा ठराव

 

सोशल मीडियावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे ४८ तासांत निराकरण केले जाते. ५० टायमर बसवण्याचा ठराव मंजूर झाला असून बचतीतून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.”

डॉ. परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष, नपा अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *