
निमझरीच्या डॉ. शुभांगी पाटील एमपीएससीत राज्यात सहावी
महिलांमध्ये पटकवला प्रथम क्रमांक
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निमझरी येथील रहिवासी तथा डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ संलग्न प्राध्यापक डॉ. शुभांगी पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या वर्ग १ गट अ अंतर्गत सहयोगी प्राध्यापक (रसायनशास्त्र) पदाच्या परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावत महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अमळनेर तालुक्यासह निमझरी गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. पाटील यांनी यापूर्वीही २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या सहयोगी प्राध्यापक पदाच्या परीक्षेत यश संपादन केले होते. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्या सध्या मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. शुभांगी पाटील या प्रा. सुभाष पाटील यांच्या सून असून निमझरीचे माजी सरपंच मधुकर पाटील यांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या कार्यरत संस्थेकडून तसेच निमझरी गावकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांनी मिळवलेले यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply