शिक्षिकेची मोटरसायकल अडवून ‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत तरुणाने केला विनयभंग

अमळनेर (प्रतिनिधी) : एका शिक्षिकेची मोटरसायकल अडवून तिचा हात धरत ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत तिला अंगावर ओढून विनयभंग केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंगसमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी जळोद येथील हिरालाल ज्ञानेश्वर रायसिंग याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिक्षिकेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास त्या त्यांच्या सहकारी ममता गोविंदराव पाटील, केदार गुणवंतराव देशमुख, अतुल संजय भदाणे, रमेश बारकु धनगर आणि जितेंद्र दिलीप साळुंखे यांच्यासोबत आपापल्या मोटरसायकलीने मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंगसमोरील रस्त्यावरून जात होत्या. यावेळी शिक्षिका केदार गुणवंतराव देशमुख यांच्या मोटरसायकलवर मागे बसून जात होत्या. दरम्यान, जळोद येथील हिरालाल ज्ञानेश्वर रायसिंग हा मोटरसायकलवर तेथे आला. त्याने शिक्षिका प्रवास करत असलेली मोटरसायकल अडवली. त्यानंतर मोटरसायकलवरून खाली उतरून शिक्षिकेचा हात धरला आणि ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत तिला अंगावर ओढून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर शिक्षिकेने घरी जाऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात जाऊन हिरालाल ज्ञानेश्वर रायसिंग याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ७४ आणि १२६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *