महापुरापासून जीव वाचविण्याचे प्रशिक्षण घेताना कोळपिंप्रीचा वीरपुत्र झाला शहीद

अमळनेर (प्रतिनिधी) : महापुरातून नागरिकांचा जीव वाचविण्याचे प्रशिक्षण घेत असतानाच कोळपिंप्री (ता. पारोळा) येथील लान्स नायक रोहित नारायण पाटील (काटे) (वय ३०) या प्यारा कमांडो जवानाला वीरमरण आले. हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात यमुना नदीवरील हथनीकुंड धरणात नियमित प्रशिक्षणादरम्यान मंगळवार, १ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता धरणापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर जिंतजवळ रोहित नारायण पाटील (काटे) यांचे पार्थिव सापडले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रशिक्षणादरम्यान रोहित नारायण पाटील (काटे) यांच्यासह पाच जवानांनी हेलिकॉप्टरमधून धरणाच्या पाण्यात उड्या मारल्या. त्यानंतर सर्व जवान एका बोटीत चढले. मात्र, बोटीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यातच पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने बोट वाहू लागली. त्यामुळे पाचही जवानांनी पुन्हा पाण्यात उड्या मारल्या. त्यापैकी तीन जवानांनी पोहत काठ गाठला; मात्र वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे रोहित नारायण पाटील (काटे) यांच्यासह आणखी एक जवान वाहून गेला. या घटनेनंतर दोन्ही जवानांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात आली. त्यातील एका जवानाचे पार्थिव १ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सापडले. मात्र रोहित नारायण पाटील (काटे) यांचा शोध गेल्या दोन दिवसांपासून सुरू होता. अखेर ३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता धरणापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर जिंतजवळ त्यांचे पार्थिव शोधण्यात यश आले. रोहित नारायण पाटील (काटे) हे १८ मेडियम रेजिमेंट, द आर्टीलरी या युनिटमध्ये १८ सप्टेंबर २०१७ पासून कार्यरत होते. देशसेवेत कार्यरत असलेल्या रोहित यांचा तीन वर्षांपूर्वी वावडे, ता. अमळनेर येथील हर्षदा यांच्याशी विवाह झाला होता. त्यांच्या संसारात अवघे अकरा महिन्यांचे हर्षदीप उर्फ रुद्र हे चिमुकले बाळ आहे. वडील नारायण रामलाल पाटील-काटे हे शेतकरी असून आई योजनाबाई पाटील या गृहिणी आहेत. त्यांचा भाऊ मनोज काटे विवाहित आहे. रोहित नारायण पाटील (काटे) यांच्या वीरमरणाची बातमी कळताच कोळपिंप्रीसह परिसरावर शोककळा पसरली आहे. देशसेवेसाठी घरापासून दूर गेलेल्या जवानाने प्रशिक्षणादरम्यान प्राणांची आहुती दिल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहित नारायण पाटील (काटे) यांची अंत्ययात्रा ४ सप्टेंबर रोजी सकाळी १२ वाजता कोळपिंप्री येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी माजी सैनिकांचे खान्देश रक्षक ग्रुपतर्फे वीर जवानाला आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *