
अमळनेरात पेट्रोल टंचाईचा गैरसमज; ‘साठा उपलब्ध, घाबरू नका’: प्रशासनाचे स्पष्टीकरण
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात आणि तालुक्यात पेट्रोलची कोणतीही टंचाई नसून काही पंप तात्पुरते बंद राहिल्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माल संपल्यानंतर पंप एक-दोन दिवस बंद राहत असल्याने ग्राहकांकडून गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरून घेण्याची गर्दी होत असून त्यामुळेच टंचाईचा भास निर्माण होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील प्रशांत निकम यांच्या शिव पेट्रोल पंपासंदर्भात बनावट सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी गेल्यामुळे सायबर गुन्हे शाखेकडून त्यांच्या तीन बँक खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार अडचणीत आल्याने संबंधित पंप सध्या बंद ठेवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर इतर पेट्रोल पंपांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल पंपांना ठरावीक दिवसांनुसार मर्यादित साठा दिला जात असल्याने एखादा पंप बंद राहिल्यास इतर पंपांवर गर्दी वाढते. त्यातच रुग्णवाहिका, पोलीस आणि प्रशासकीय वाहनांसाठी आवश्यक साठा राखून ठेवण्याचे आदेश असल्याने काही वेळा ग्राहकांना पेट्रोल नाकारले जात असल्याचा गैरसमज पसरतो. सुरुवातीला नायरा पंपावर पेट्रोल उपलब्ध होते, तर आर.के. पेट्रोल पंप बंद होते. सध्या नायरा पंपावरील साठा संपला असला तरी आर.के.चे दोन्ही पंप सुरू झाले आहेत. बोहरी पंपावरही नियमित पेट्रोल वाटप सुरू आहे. नायरा कंपनीचे पेट्रोल मुंबईवरून येत असून प्रत्येक पंपाला निश्चित कोटा दिला जातो. त्यामुळे नियोजित कालावधीनंतरच साठा उपलब्ध होतो. ग्राहकांकडून गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरून घेतल्यामुळे इतरांना त्रास होत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
नागरिकांनी पॅनिक होऊ नये
नागरिकांनी पॅनिक होऊ नये आणि गैरसमजाला बळी पडू नये. एखाद्या पंपावरील पेट्रोल संपले तरी इतर पंपावर लगेच पेट्रोल येते. पंपांवर जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली आहे. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील दिला आहे. संपले तरी लगेच पेट्रोल उपलब्ध होत आहे. वरिष्ठ पातळीवरून काहीही बंदी नाही.
–रुकसाना शेख, पुरवठा निरीक्षक, अमळनेर

Leave a Reply