
व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवगर्जनांनी शिवजयंती उत्साहात साजरी
अमळनेर (प्रतिनिधी ) व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “आले किती, गेले किती, उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा…” अशा शिवगर्जनांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर शिवगर्जनांनी परिसर दुमदुमून गेला.
व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहात रॅली काढत परिसर शिवमय केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुंदर व्यक्तिरेखा साकारून उपस्थितांची मने जिंकली. शिवजयंती निमित्त भाषण, रांगोळी, नृत्य आणि जोशपूर्ण पोवाडे सादर करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. “झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजीचा” या गीताने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. पोवाड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा प्रभावीपणे उलगडली. भगवे ध्वज हातात घेऊन विद्यार्थ्यांनी महाराजांप्रती आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त केला.
संस्थेचे चेअरमन मा. श्री उत्कर्ष पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराजांचा संघर्षमय इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच उपाध्यक्ष श्री. उमाकांत पाटील यांनी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. शाळेच्या सचिव अलका पवार व मुख्याध्यापिका वर्षा सोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगिता फाळके, मनीषा सोनार, प्रतीक्षा पाटील, नीतू शेलकर, संगीता पाटील, कविता पाटील, मनीषा ठाकूर, रोशनी महाजन, जयश्री परदेशी, चारूलता तायडे, प्रियंका महाले तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
शिवभक्ती, देशप्रेम आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

Leave a Reply