चोरट्यानी शेगावला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

अमळनेर शहरातील प्रताप मिल कंपाऊंडमधील घटना

 

अमळनेर (प्रतिनिधी) शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३,४३,९६४ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील प्रताप मिल कंपाऊंड परिसरात घडली. ही घटना दिनांक १२ रोजी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रुपाली राजेंद्र शिरसाठ (रा. प्रताप मिल कंपाऊंड, अमळनेर) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दि. १० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्या, त्यांची मुलगी संगमित्रा व तिची दोन्ही मुले असे शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ०९.४५ वाजता शेजारील महिलेने फोन करून घराचा पुढील दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर येथे परतल्या. घरात प्रवेश केल्यावर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बेडरूममधील कपाट उघडून पाहिले असता तिजोरीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी २५ ग्रॅम सोन्याची पोत, ५ ग्रॅमची अंगठी, ५ ग्रॅमचे कानातील टोंगल, ७ ग्रॅमचे मनी मंगळसूत्र, १० ग्रॅमचे सोन्याची चैन, २ ग्रॅमचा सोन्याचा तुकडा, १ ग्रॅमचे सोन्याचे मनी, ११ ग्रॅमची सोन्याची चैन, ४ ग्रॅमची अंगठी, १३ ग्रॅमची सोन्याची पोत, २.३२ ग्रॅमचे मंगळसूत्र तसेच ५०,००० रुपये रोख असा एकूण ३,४३,९६४ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *