मृत्यूच्या दाढेतून चिमुकल्या शिवला आणले खेचून ; डॉ. शरद बाविस्कर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश!

अमळनेर (प्रतिनिधी) घराजवळ खेळता खेळता जनावरांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदात पडलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्या शिव विश्वास भिक (वय २ वर्षे, रा. ढेकू) याला गंभीर अवस्थेतून बाहेर काढत डॉ. शरद बाविस्कर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे नवजीवन मिळाले. अमळनेर येथील कस्तुरबा बालरुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे, शिवच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याचे वडील ऊसतोड कामगार आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. शरद बाविस्कर यांनी बालकावर मोफत उपचार करून सामाजिक बांधिलकी जपली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिव घराजवळ खेळत असताना अचानक जनावरांसाठी असलेल्या पाण्याच्या हौदात पडला. काही वेळाने घरात शिव दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या आईने घाबरून परिसरात शोध सुरू केला. शोध घेत असताना शिव हौदात पडल्याचे तिच्या निदर्शनास आले. आईने तातडीने त्याला हौदातून बाहेर काढले. बालकाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन त्याला तात्काळ वाहनाने डॉ. अनिल शिंदे व डॉ. संदीप जोशी यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी डॉ. शरद बाविस्कर यांच्या समन्वयाने वेळ न दवडता आवश्यक जीवनावश्यक उपचार केले. बालकाची अवस्था गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी धुळे येथे नेण्याचा पर्यायही सांगण्यात आला; मात्र ते उपचार कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत अत्यंत खर्चिक ठरणारे होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. शरद बाविस्कर यांनी शिवला अमळनेर येथील कस्तुरबा बालरुग्णालयात दाखल करून घेतले. बालकाची अवस्था गंभीर असल्याने उपचारांचे आव्हान मोठे होते. मात्र, “बालकाचा जीव वाचवायचा” या उद्देशाने डॉ. शरद बाविस्कर यांनी वैद्यकीय पथकासह शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आवश्यक उपचार आणि वैद्यकीय देखरेखीमुळे काही काळानंतर शिवच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. उपचारानंतर बालक पूर्णपणे बरा झाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 

हलाखीच्या परिस्थितीतही उपचारांचा खर्च घेतला नाही

 

शिवच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याचे वडील ऊसतोड कामगार आहेत. अशा परिस्थितीत बालकाच्या उपचारांचा मोठा खर्च करणे कुटुंबासाठी आर्थिकदृष्ट्या कठीण होते. मात्र, डॉ. शरद बाविस्कर यांनी कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन बालकावर मोफत उपचार केले.

 

डॉक्टरांनी दिली मायेची भेट

 

शिवला नवजीवन मिळाल्यानंतरही डॉ. शरद बाविस्कर यांनी केवळ उपचारांपुरती आपली जबाबदारी मर्यादित न ठेवता बालकाला नवीन कपडे घेऊन दिले. त्यांच्या या माणुसकीच्या कृतीने कुटुंबीय भावूक झाले. “डॉक्टरांनी आमच्या मुलाला नवजीवन दिले. आमची परिस्थिती अत्यंत बिकट असताना त्यांनी मोफत उपचार केले आणि मुलासाठी नवीन कपडेही दिले. त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही,” अशी भावना शिवच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. या घटनेतून वैद्यकीय सेवेसोबतच माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचे दर्शन घडले. गरीब ऊसतोड कामगार कुटुंबातील चिमुकल्या शिवला गंभीर अवस्थेतून बाहेर काढून नवजीवन देण्यात डॉ. शरद बाविस्कर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *