महापुरुष वाटून घेतले, पण जिवंत स्त्रीची अब्रू लुटली जाते तेव्हा रक्त का उसळत नाही?

काव्य मैफलीत कवयित्री गुंजन पाटील यांचा खोचक सवाल

अमळनेर (प्रतिनिधी) “तुम्ही साऱ्यांनी महापुरुष वाटून घेतले आहेत. पुतळ्याची विटंबना होते तेव्हा तुमचे रक्त उसळते; मात्र जिवंत स्त्रीची अब्रू लुटली जाते, तेव्हा तुमचे रक्त का उसळत नाही?” असा खोचक सवाल सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनी अमळनेर येथील काव्यसंध्या मैफलीत केला.

पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी शेतकी संघाचे संचालक विक्रांत पाटील व नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील यांच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुंजन पाटील यांनी आपल्या विनोदी आणि प्रेमकवितांपासून प्रबोधनात्मक कवितांकडे जाताना शेतकरी, स्त्री जाणीव आणि स्त्री समानतेचे विविध प्रश्न आपल्या कवितांमधून मांडले. “मी शेतकऱ्याची पोर, माझ्या बापाचा हिशोब मागते”, “महाराष्ट्राचा यूपी-बिहार का होत आहे”, “गरीब सीता”, “डोरलं”, “मला आई व्हायचं नाही” यांसह अनेक कविता त्यांनी सादर केल्या. यावेळी त्यांनी शासनाच्या हमीभावाच्या धोरणांवर तसेच कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये महिलांना कमी कपड्यांत दाखवण्याच्या प्रवृत्तीवर खरमरीत टीका केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गुंजन पाटील यांच्या कविता मनाला भावणाऱ्या असून त्या समाजाला दिशा देणाऱ्या आहेत, असे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी उपस्थित प्रेक्षकांना पोलीस बंदोबस्ताविना सण व उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी स्वतः, विक्रांत पाटील, गुंजन पाटील व जयश्री पाटील यांच्या वतीने दुष्काळ निधीसाठी ५० हजार रुपये जाहीर केले. यावेळी डॉ. भाग्यश्री वानखेडे लिखित ‘एक सावित्री’ या कवितासंग्रहाचे आणि मीराबाई साळी लिखित ‘निरार्थ’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या मिरवणुका वेळेत पार पाडल्याबद्दल पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस कुटुंब म्हणून पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांचा कुटुंबासह, आरोग्य निरीक्षक संतोष माणिक यांचा कर्मचाऱ्यांसह, विद्युत अभियंता हेमंत सैंदाणे आणि होमगार्ड कैलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, नगराध्यक्ष बाविस्कर, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, कवी शरद धनगर आणि नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील उपस्थित होते. कवी शरद धनगर यांच्या अहिराणी कवितेने प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट केले. प्रास्ताविक आयोजक सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरुण पाटील, विजय राजपूत, सुनील भोई, भूषण महाजन आणि मॉन्टी साळी यांनी सहकार्य केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *