
श्रावणमासानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा प्रा. श्री. भरतसिंग परदेशी सपत्नीक विशेष मानकरी; भाविकांनी घेतला दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ
अमळनेर (प्रतिनिधी )श्रावणमासाच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मंगळग्रह मंदिरात मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक परंपरेनुसार ही महापूजा विधिवत पार पडली.
या महापूजेचे विशेष मानकरी म्हणून प्रा. श्री. भरतसिंग परदेशी व नगरसेविका सौ. कल्पनाताई परदेशी हे दाम्पत्य उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची विधिवत पूजा, सत्यनारायण कथाश्रवण व आरती आदी धार्मिक विधी संपन्न झाले.
श्रावण महिना हिंदू धर्मपरंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात विविध धार्मिक अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा तसेच सत्यनारायण महापूजेला विशेष महत्त्व आहे. सत्य, श्रद्धा, सदाचार आणि कुटुंबाच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करण्याची पवित्र परंपरा म्हणून सत्यनारायण पूजेकडे पाहिले जाते.
या महापूजेचे पौरोहित्य मंदिराचे पुरोहित वैभव लोकाक्षी, जयेंद्र वैद्य व परशुराम शर्मा यांनी केले. त्यांना उमेश पाठक यांनी सहकार्य केले.
महापूजेच्या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसरात मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महापूजेनंतर उपस्थित भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी ९ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ राहिली. भाविकांनी श्री मंगळग्रहाचे दर्शन घेत तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. बाविस्कर, सचिव सुरेश बाविस्कर यांच्यासह मंगल सेवेकरी, मंदिर सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply