अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड; पीडितेने बाळाला दिला बाळाला जन्म

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथील एका नराधमाने अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहून तिने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून बोदर्डे येथील संशयित आरोपी विनोद बाळू भिल याच्याविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संशयित आरोपी विनोद भिल याने तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. दरम्यान, ८ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला तेव्हा सदर अल्पवयीन मुलगी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर २१ जून रोजी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलगी प्रसूत झाली असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. धुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पीडितेच्या वडिलांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी विनोद बाळू भिल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(एम) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा – २०१२) चे कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *