
अचानक विषयांवरील वक्तृत्व स्पर्धेत जयश्री पवार प्रथम
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत व हौशी महिलांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अचानक दिलेल्या विषयांवरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सहभागी स्पर्धकांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेत जयश्री पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सीमा पाटील यांनी द्वितीय, तर स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पुरस्कार रेखा मराठे आणि अपेक्षा पाटील यांना प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत आशा पाटील, पूजा पाटील, श्वेता पाटील, शोभा पाटील, रजुताई सूर्यवंशी, मंगलाबाई पाटील, प्रतिभा शिसोदे, मनीषा पाटील, उर्मिला पाटील, प्रियदर्शनी भोसले, माधुरी पाटील आणि योगिता सूर्यवंशी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. प्रत्येक स्पर्धकाने अचानक मिळालेल्या विषयावर आत्मविश्वासाने विचार मांडत आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्री पाटील होत्या. प्रास्ताविक सुलोचना वाघ यांनी केले. सूत्रसंचालन गायत्री भदाणे आणि स्वप्ना पाटील यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून भारती (आक्का) पाटील आणि भारती पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंगला पाटील, सुनीता पाटील, लीना पाटील, पद्मजा पाटील, माधुरी पाटील, मनीषा पाटील, प्रभावती पाटील, राजश्री पाटील, कृपाली पाटील आणि नलिनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली. महिलांमधील वक्तृत्वकला, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सार्वजनिकरित्या विचार मांडण्याची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाच्या या उपक्रमाचे सहभागी महिलांसह उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply