शेतकी संघाच्या १९६ खताच्या गोण्या आढळल्या टायरच्या दुकानात

जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस,  ते संघाचेच गोदाम असल्याचा खुलासा

 

अमळनेर (प्रतिनिधी) शेतकी संघाला आलेल्या खताच्या तब्बल १९६ गोण्या टायरच्या दुकानात ठेवलेल्या आढळून आल्याने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र ते दुकान म्हणजे शेतकी संघाचेच गोदाम असून यात गैरव्यवहार काहीच नाही असा खुलासा संघाच्या वतीने करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  इफको कंपनीच्या १०:२६:२६ खताच्या गोण्या शेतकी संघाजवळ संघाच्याच मालकीच्या असलेल्या टायरच्या दुकानात ठेवलेल्या असून या खताची काळ्या बाजारात परस्पर विल्हेवाट लावली जाणार असल्याची नागरिकांची तक्रार होती. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जिल्हा कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्याकडे फोटोसह तक्रार केल्यानंतर १७ रोजी रात्रीच त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्याठिकाणी टायरच्या दुकानात १९६ खतांच्या गोण्या आढळून आल्या. त्यावेळी शेतकी संघातर्फे कृषी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की हे गोदाम देखील शेतकी संघाचे आहे. दरम्यान, शेतकी संघाने अमर टायर याला दुकान भाड्याने दिले आहे. त्याच्याकडे देखील दुकानाची किल्ली असल्याने तो रात्री अपरात्री दुकान उघडतो. म्हणून नागरिकाना भ्रष्टाचाराचा संशय आला होता.

 

कोणताही गैरप्रकार झालेला नाही

 

याबाबत शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की ते संघाचे गोदाम आहे. भाड्याने दिले असले तरी तो सांभाळ करतो, त्यामुळे संघाची सुरक्षा देखील राहते, याठिकाणी कोणताही गैरप्रकार झालेला नसून खतासाठी लायसन्सला जे गोदाम दाखविले आहे ते हेच गोदाम आहे. तसेच टंचाई काळात शेतकी संघाच्या मार्फतच शासनाकडून शेतकरी बांधवाना पुरेसा खत पुरवठा होत असतो असेही त्यांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *