दीपक नगरात नळाला गढूळ पाणी; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, पालिका प्रशासनाविरोधात संताप

हे पिण्याचे पाणी की नाल्याचे?’ नागरिकांचा संतप्त सवाल; कर्मचाऱ्याच्या उर्मट वर्तनाने संताप अधिकच वाढला

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील दीपक नगर परिसरात गुरुवारी नगरपालिकेकडून झालेल्या पाणीपुरवठ्यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नळाला आलेले पाणी अत्यंत गढूळ, मातीमिश्रित व घाणेरडे असल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनावर करदात्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र नेमके कोणत्या दर्जाचे शुद्धीकरण करते, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी दीपक नगर परिसरात नळाला आलेले पाणी पाहून नागरिकांना धक्का बसला. पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ, माती व गढूळपणा असल्याने ते पिण्यायोग्य नसल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक घरांमध्ये पाणी भरल्यानंतर त्याचा रंग आणि गुणवत्ता पाहून नागरिकांनी ते वापरण्यास नकार दिला. काहींनी या पाण्याचे नमुने, तसेच व्हिडिओ आणि छायाचित्रे माध्यमांकडे पाठवून पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना गढूळ व मातीमिश्रित पाणी पुरवठा करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आता नागरिकांना पाणी गाळून, उकळून वापरण्याची वेळ आली असून घरातील लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकाराबाबत संबंधित पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला नागरिकांनी जाब विचारला असता, अपेक्षित उत्तर किंवा दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी “माझ्याकडे काय सांगता, थेट पालिकेकडे जाऊन तक्रार करा,” असे उत्तर दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कथित उर्मट व बेजबाबदार वर्तनामुळे परिसरातील रहिवाशांचा संताप अधिकच वाढला आहे. जनतेच्या पैशातून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारचे उत्तर अपेक्षित नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या प्रकरणी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “अशा प्रकारे गढूळ पाणी यायला नको. याबाबत पाणीपुरवठा अभियंत्यांकडे तातडीने विचारणा करून आवश्यक कार्यवाही केली जाईल,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, केवळ विचारणा करून प्रश्न सुटणार नसून प्रत्यक्षात जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दीपक नगरातील रहिवाशांनी नगरपालिकेने तातडीने पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून गढूळ पाणी येण्यामागील कारण स्पष्ट करावे, जलशुद्धीकरण प्रक्रियेची चौकशी करावी आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे अमळनेर शहरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नगरपालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *