महिला समुपदेशन केंद्रातून ९१ कुटुंबांमध्ये पुन्हा सलोखा; वर्षभरात १५१ तक्रारींचे निवारण

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने तसेच आधार बहुद्देशीय संस्था, अमळनेर संचलित महिला समुपदेशन केंद्रामार्फत ९१ कुटुंबांमध्ये पुन्हा सलोखा निर्माण केला असून वर्षभरात १५१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

या केंद्रमार्फत महिलांना विविध प्रकारच्या समस्यांवर मार्गदर्शन व मदत केली जात आहे. जुने पोलीस स्टेशन (तहसील कार्यालय) आवारात हे केंद्र कार्यरत असून येथे समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले प्रशिक्षित समुपदेशक कार्यरत आहेत.

महिला व बालक सहाय्य कक्षांतर्गत चालणाऱ्या या केंद्रामार्फत महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार, घरगुती वाद, भावनिक ताणतणाव, आर्थिक छळ, मुलांचा ताबा न देणे, शारीरिक व मानसिक त्रास, व्यसनाधीनतेमुळे होणारे प्रश्न, शैक्षणिक व महत्त्वाची कागदपत्रे हिसकावून घेणे तसेच महिलांना घरातून बाहेर काढणे अशा विविध समस्यांवर समुपदेशन, प्रत्यक्ष मदत, संदर्भ सेवा आणि कायदेशीर सल्ला दिला जातो. याशिवाय महिलांना कायदेशीर मार्गदर्शन, निवारा गृहाची सुविधा, वैद्यकीय सेवा, विविध शासकीय योजनांची माहिती तसेच मोफत सरकारी वकील मिळवून देण्यासाठी मदत केली जाते. गरजू महिलांच्या पुनर्वसनासाठीही केंद्रामार्फत प्रयत्न केले जातात.

महिलांमध्ये कायद्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ग्रामीण व शहरी भागात विविध कायदे, समुपदेशन केंद्राची माहिती तसेच कौटुंबिक हिंसाचारासंदर्भातील माहितीपत्रकांचे वाटप करून जनजागृती केली जाते. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये विवाहपूर्व समुपदेशन, महिला सहाय्य कक्ष आणि हेल्पलाइन क्रमांकांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येते.

मागील वर्षभरात महिला समुपदेशन केंद्राकडे १५१ महिलांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यापैकी ३० महिलांना कायदेशीर मदतीसाठी न्यायालयात पाठविण्यात आले, तर ९१ कुटुंबांमधील गैरसमज दूर करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्यात केंद्राला यश आले आहे. या कार्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पोलीस प्रशासन, आधार संस्थेच्या अध्यक्षा, सचिव यांचे सहकार्य लाभत आहे. केंद्रात समुपदेशक म्हणून श्रीमती रेणू प्रसाद व श्रीमती ज्ञानेश्वरी पाटील कार्यरत आहेत.

परिसरातील कोणत्याही महिलेला अडचण असल्यास महिला समुपदेशन केंद्राशी ७९७२३३९५६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *