पी.बी.ए. स्कूलमध्ये तीन दिवस मैदानावर रंगला क्रीडोत्सव

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित तीन दिवसीय हिवाळी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण, आनंदमय आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यात खिलाडूवृत्ती, सांघिक भावना, शारीरिक क्षमता आणि आत्मविश्वास विकसित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध मैदानी व मनोरंजक क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कौशल्य दाखविले.

स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक महेश माळी आणि पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी यांच्या हस्ते माता सरस्वती व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आला. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांमध्ये तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर धावणे, डॉजबॉल, कबड्डी, क्रिकेट, स्लो सायकलिंग, बुक बॅलन्सिंग, गोळाफेक आदी स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये ग्रीन हाऊस, येलो हाऊस, रेड हाऊस आणि ब्लू हाऊस अशा चार हाऊसच्या संघांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत चुणूक दाखवत स्पर्धांमध्ये रंगत आणली. या स्पर्धांचे क्रीडा मार्गदर्शन, संयोजन, संकल्पना तसेच पंच व रेफरी म्हणून क्रीडा शिक्षक महेश माळी, विनायक सूर्यवंशी, रोहन मुंदडा आणि प्रशांत वंजारी यांनी जबाबदारी पार पाडली. या क्रीडा स्पर्धांसाठी शाळेचे चेअरमन संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी, व्ही. एस. अमृतकर, निलेश चौधरी, अशोक महाजन, लक्ष्मण पाटील यांच्यासह समस्त शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *