
देखभालीअभावी धार-मालपूर पाझर तलावाची दुरवस्था; काटेरी झुडपांनी बांधाला विळखा, सांडव्यातून पाण्याची गळती
१२ ते १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न ऐरणीवर

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार-मालपूर परिसरातील १२ ते १५ गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा महत्त्वाचा आधार असलेल्या पाझर तलावाची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. तलावाच्या बांधावर आणि सांडव्यालगत मोठ्या प्रमाणावर काटेरी झाडे-झुडपे वाढली असून, त्यांच्या मुळांमुळे अनेक ठिकाणचे दगडी पिचिंग उखडले आहे. त्यातच सांडव्यालगतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू असल्याने तलावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात १२ ते १५ गावांच्या पाणीपुरवठ्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धार-मालपूर पाझर तलावाची निर्मिती झाल्यापासून त्याची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि आवश्यक संरक्षक उपाययोजना पुरेशा प्रमाणात झालेल्या नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे वाढली आहेत. या झुडपांच्या मुळांनी दगडी पिचिंगमध्ये शिरकाव केल्याने अनेक ठिकाणी दगड उखडले असून, बांधाच्या मजबुतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे तलावाच्या सांडव्यालगतही झाडाझुडपांची वाढ झाली असून, याच भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे दिसून येत आहे. पाण्याचा सतत प्रवाह सुरू राहिल्यास बांधाच्या संरचनेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी तलावाची तातडीने तांत्रिक तपासणी करण्याची गरज आहे. धार-मालपूर पाझर तलाव हा परिसरातील १२ ते १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. तलावातील पाण्याचा शेतीसाठीही मोठा उपयोग होत असून, परिसरातील अनेक शेतकरी बागायती पिके घेतात. याशिवाय तलावामुळे भूजलपातळी टिकून राहण्यास मदत होत असल्याने परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीला आधार मिळतो. त्यामुळे तलावाची दुरवस्था कायम राहिल्यास केवळ पिण्याच्या पाण्याचाच नव्हे, तर शेती आणि भूजलसाठ्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
तलावाच्या सद्यस्थितीची संबंधित लघु सिंचन विभागाने तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, बांधाची तांत्रिक तपासणी करावी, वाढलेली काटेरी झाडे-झुडपे हटवावीत, उखडलेले दगडी पिचिंग पूर्ववत करावे आणि सांडव्यालगतची पाण्याची गळती कायमस्वरूपी थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून होत आहे.
तांत्रिक पाहणीनंतर दुरुस्तीची कामे प्रस्तावित करणार
“धार-मालपूर पाझर तलाव या पावसाळ्यातच जि.प. लघु पाटबंधारे विभागाकडून आमच्या विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून तलावाच्या बांधाची, दगडी पिचिंगची तसेच सांडव्यालगतच्या गळतीची स्थिती तपासण्यात येईल. काटेरी झाडे-झुडपे वाढल्यामुळे पिचिंगचे नुकसान झाले असल्यास ती तातडीने हटविण्याबाबत कार्यवाही केली जाईल. आवश्यक दुरुस्तीची कामे तांत्रिक पाहणीनंतर प्रस्तावित करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.”
एस. जी. पाटील, उपविभागीय अभियंता, लघु सिंचन विभाग, पारोळा
प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे
“धार-मालपूर पाझर तलावावर १२ ते १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न अवलंबून आहे. पाझर तलाव पूर्ण झाल्यापासून तलावाची योग्य देखभाल झालेली नाही. काटेरी झाडाझुडपांमुळे दगडी पिचिंग उखडले असून सांडव्यालगत पाण्याची गळती सुरू आहे. तलावाची अवस्था आणखी खराब होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने पाहणी करून झाडे-झुडपे हटवावीत, गळती बंद करावी आणि बांधाची दुरुस्ती करावी.”
किशोर पाटील, ग्रामस्थ, मालपूर

Leave a Reply