
खबरीलाल ऑनलाईनच्या ‘स्टींग ऑपरेशन’ची तहसीलदारांकडून दखल; कोऱ्या शिधापत्रिका प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) ‘खबरीलाल ऑनलाईन वेबपोर्टल’ने कोऱ्या शिधापत्रिकांबाबत (रेशन कार्ड) केलेल्या ‘स्टींग ऑपरेशन’ची अमळनेर तहसील प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात तहसीलदार यांनी वेबपोर्टलचे मुख्य संपादक जितेंद्र ठाकूर यांना पत्र पाठवून संबंधित शिधापत्रिकेचा क्रमांक उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करता येईल, असे म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘खबरीजलाल ऑनलाईन वेबपोर्टल’वर कोऱ्या शिधापत्रिकांच्या काळ्याबाजाराबाबत किंवा गैरव्यवहाराबाबत बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीमुळे महसूल आणि पुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना तहसीलदारांनी पत्रात नमूद केले आहे की, मागील ३ ते ४ वर्षांपासून अमळनेर तहसील कार्यालयाकडून कोणतीही ऑफलाईन शिधापत्रिका देण्यात आलेली नाही. सध्या सर्व लाभार्थ्यांना केवळ ऑनलाईन शिधापत्रिकाच पुरवल्या जातात. असे असतानाही बातमीत दाखवलेली शिधापत्रिका कुठून आली, याची शहानिशा करणे प्रशासनासाठी आवश्यक बनले आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित बातमीतील शिधापत्रिकेचा क्रमांक मागवला असून, हा क्रमांक प्राप्त होताच सदर प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाईल आणि त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार यांनी स्पष्ट केले आहे. या भूमिकेमुळे आता या कोऱ्या शिधापत्रिकांच्या रॅकेटचा पर्दाफाश होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply