
जेईई, नीट, सीईटीत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सन्मान; दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) मराठा सेवा संघ, अमळनेर यांच्या वतीने जेईई, नीट आणि सीईटी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी जेईई, सीईटी आणि नीट परीक्षेची तयारी तसेच मानसिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते प्रा. शरद पाटील, संस्थापक-संचालक, व्हिजन ॲडमिशन अँड करिअर कन्सल्टन्सी, पुणे यांनी विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी आणि नीट परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन, परीक्षेतील आव्हाने आणि मानसिक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासासोबत योग्य नियोजन आणि मानसिक तयारीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या कल्पेश भानुदास पाटील याने नीट परीक्षेत ५७० गुण मिळवून बारामती येथे एमबीबीएस प्रवेश मिळवल्याबद्दल, निर्मलकुमार अविनाश पाटील याने आयआयटी इंदूरमध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल, ऋत्विक राकेश सोनवणे याने नीट परीक्षेतील यशाबद्दल, निर्भय संदीपकुमार साळुंखे याने जेईई परीक्षेत यश मिळवून आयआयटी दिल्ली येथे प्रवेश मिळवल्याबद्दल, सई किरण देसले हिने नीट परीक्षेत ६७१ गुण मिळवून एम्समध्ये एमबीबीएस प्रवेश मिळवल्याबद्दल, आयुष चंद्रशेखर भामरे याने ५४५ गुण मिळवून बुलढाणा येथे एमबीबीएस प्रवेश मिळवल्याबद्दल आणि उत्कर्षा हरीओम महाजन हिने नीट परीक्षेत यश मिळवून शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
तसेच लोकेश विलास पाटील याने सीईटी परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवल्याबद्दल, सुयश शरद शिंदे मांडळ याने नीट परीक्षेत ६५० गुण मिळवून केईएम, मुंबई येथे प्रवेश मिळवल्याबद्दल, तन्वी योगेश पाटील, देवयानी मनोहर पाटील, दर्शन नंदकिशोर सोनवणे आणि हितार्थ राहुल महाजन यांनी सीईटी परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आला. शिवम अशोक साळुंखे याने आयआयआयटी भोपाळमध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल, कौस्तुभ ज्ञानेश्वर देशमुख याच्या यशाबद्दल, हर्षल माधव वाघमारे याने नीट परीक्षेत यश मिळवून एमबीबीएस प्रवेश मिळवल्याबद्दल तसेच नयन भैय्यासाहेब पाटील याने सीईटी परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवल्याबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान डॉ. लिलाधर पाटील लिखित महात्मा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त ‘सत्यशोधक मेळा’ या कलापथकाचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन योगेश भदाणे यांनी केले, तर आभार योगेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विक्रांत पाटील, वसुंधरा लांडगे, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. डॉ. विलास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष वैशाली शेवाळे, कैलास पाटील, प्रा. अशोक पवार, बापुराव ठाकरे, दीपक पाटील, वाल्मिक पाटील, योगेश पाटील, निंबाजी पाटील, महेश पाटील, संदीप खैरनार, कुणाल पवार, रामेश्वर भदाणे आणि उमेश काटे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply