
मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला प्रतिसाद; ८६ रुग्णांची पनवेलमध्ये होणार शस्त्रक्रिया
अमळनेर (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत मंगळग्रह सेवा संस्था आणि आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण १८७ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ८६ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात अमळनेरसह धुळे, चोपडा, जळगाव, पारोळा, एरंडोल तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिरामुळे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली.
शिबिरात डॉ. विजय बामणे, डॉ. सुधीर फडतरे, डॉ. मोहसीन शेख, डॉ. राहुल चौधरी आणि भूपेंद्र वाघ यांनी रुग्णांची सखोल नेत्र तपासणी केली. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर यांनी वैद्यकीय पथकाचे स्वागत केले. तसेच मंदिराचे सेवेकरी मनोहर तायडे, कैलास महाजन, प्रमोद पाटील, भाऊसाहेब पाटील आणि किरण पाटील यांच्यासह सर्व सेवेकऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले, तर सहसचिव दिलीप बहिरम यांनी आभार मानले.
दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी शिबिर
परिसरातील गरजू रुग्णांना नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी श्री मंगळग्रह मंदिर येथे हे शिबिर नियमितपणे आयोजित केले जाते. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्ण पनवेलला रवाना
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ८६ रुग्णांना गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्री मंगळग्रह मंदिरातून विशेष वाहनाद्वारे पनवेल येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल येथे नेण्यात येणार आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

Leave a Reply