अंबाऋषी टेकडीवर दामिनी पथकाने प्रेमी युगुलांची चार जोडपी पकडली रंगेहात

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून शहराबाहेरील अंबाऋषी टेकडी परिसरातील दाट झाडीचा गैरफायदा घेत प्रेमी युगुलांची वर्दळ वाढल्याची बाब समोर आली असून दामिनी पथकाने धाड टाकत चार प्रेमी युगुलांना रंगेहात पकडल्याची घटना १० रोजी दुपारी घडली. पोलिसांनी संबंधित तरुण-तरुणींना ताब्यात घेत समज देत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहराच्या पूर्वेला नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना अंबाऋषी टेकडीवर आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केल्याने येथे दाट झाडी निर्माण झाली असून पर्यावरण समृद्ध होऊन ऑक्सिजन पार्कसारखा परिसर तयार झाला आहे. मात्र या शांत व निर्जन परिसराचा गैरफायदा घेत काही प्रेमी युगुल दुपारच्या वेळी येथे येऊन प्रेमचाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

१० रोजी दुपारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व नम्रता जरे यांना फोनवरून याबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक निकम यांनी तातडीने दामिनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकातील पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे, नम्रता जरे, उज्वलकुमार म्हस्के व प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पथकाने गुप्तपणे परिसरात जाऊन चारही बाजूंनी घेराव घालत प्रेमचाळे करत असलेल्या चार तरुणी व चार तरुणांना रंगेहात पकडले. त्यानंतर सर्वांना अमळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी चौकशी केल्यावर संबंधित तरुण-तरुणी हे वडजाई (ता. धुळे), बिलाडी (ता. धुळे), वसंतनगर (ता. पारोळा), सांगवी तांडा (ता. चाळीसगाव), मोरफड मंगरूळ व पारोळा येथील असल्याचे समोर आले.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सर्वांना समज देत त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि तरुण-तरुणींना पालकांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे परिसरात चर्चा रंगली असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

 

दामिनी पथकाची करडी नजर

 

शहराबाहेरील निर्जन ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत यासाठी दामिनी पथकाची करडी नजर कायम राहणार आहे. तसेच मुलींची छेडछाड करणारे किंवा टवाळखोरी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल.

दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *